जेएनपीए बंदरात 22 टन हेरॉइन जप्त

1800 कोटी रुपयांचा माल ताब्यात; दिल्ली पोलिसांची कारवाई

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1725 कोटी रुपयांचे 22 टन हेरॉइन ताब्यात घेतले आहे.

एका कंटेनरमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. उरणमधील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. हा कंटेनर एक वर्षांपासून असल्याचे समजते. जेएनपीए बंदराचे नाव समोर येत असले तरी हे अंमली पदार्थ नक्की कुठल्या यार्डमध्ये सापडले हे गुलदस्त्यात आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांनी अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी 1200 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले असल्याचे समजते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता, मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचे समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी रक्तचंदनाचा मोठा साठा पकडण्यात आला होता. त्यानंतर लगेच ही मोठी कारवाई झाली आहे. यामुळेच जेएनपीए बंदर हे तस्करांचा प्रमुख अड्डा बनला असल्याचे दिसत आहे.

अंमली पदार्थांचा कंटेनर हा 21 जून 2021 ला जेएनपीए बंदरात आला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. कोणत्याच सुरक्षा यंत्रणांना आतापर्यंत याबाबत माहिती नव्हती असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा अंमली पदार्थांचा साठा जेएनपीए बंदरात पकडला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरातील कोणत्या यार्डमध्ये अंमली पदार्थांचा साठा पकडला याची माहिती स्थानिक प्रशासनाला ही माहिती नाही. त्यामुळे अंमली पदार्थांचा साठा नक्की कुठे सापडला, याची माहिती गुलदस्त्यातच असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version