| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानीच असते. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना म्हटले की चाहत्यांचा उत्साह शिगेला असतो. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसी स्पर्धेतच लढत होते. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी चाहते हजारो, लाखो रुपये खर्च करतात. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली होती. तिकिटांची खरेदी करण्याआधीच अनेकांनी हॉटेल्स, फ्लाइट तिकिट काढली होती. हॉटेल खोल्यांच्या भाड्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले होते. आता भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटांची किंमतीने उच्चांक गाठले आहेत. भारतीय सामन्याची तिकिटे काही संकेतस्थळाने विकली आहेत. एका संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे उपलब्ध आहेत. पण त्याची किंमत लाखो रुपये इतकी आहे.
यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरोधात चेन्नई येथे होणार आहे. विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार चौदा ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर होणार आहे. वियागोगो नावाच्या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिटांची किंमत तब्बल ५७ लाख रुपये इतकी आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिट ऐशी हजार रुपयांपासून सुरु होतेय. वियागोगो संकेतस्थळावरील भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत पोस्ट करत चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला सवाल केला आहे.