हजारो भाविकांनी घेतले दर्शन
। कर्जत । वार्ताहर ।
तालुक्यातील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर (चर्च) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी 13 ऑक्टोबर किंवा त्यानंतर येणार्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. यंदा 13 तारीख रविवारी आल्याने 89 वी फातिमा मातेची तीर्थयात्रा उत्साहात संपन्न झाली. देश विदेशांतून आलेल्या भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. तसेच अन्य धर्मियांनी देखील उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले. कर्जत रेल्वे स्थानकानजीक असलेल्या चर्चच्या परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी फातिमा मातेच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. चर्चचे प्रमुख फादर जॉय डिसिल्वा यांच्या उपस्थितीत फादर नेईल दोस संतोस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन धर्मियांबरोबरच अन्य धर्मीय भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला.
त्यानंतर व्यासपीठावर दीप प्रज्वलित करून एका विशेष समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. फादर जॉय डिसिल्वा यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात चर्चची महती सांगितली. त्यानंतर प्रमुख व्याख्याते नेईल डोस संतोस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मारिया सर्वसामान्य व्यक्ती होती, देवाने निवडलेली व्यक्ती होती. करुणायुक्त हृदय, धैर्यवान, वचनबद्ध व्यक्ती होती. तिच्या जीवनाचे महत्व आपण जाणून घेतल्यास आपल्या मध्ये नक्की आध्यत्मिक परिवर्तन शक्य आहे, असे स्पष्ट केले. दिवसभरात अन्य समाजाच्या भाविकांनी फातिमा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. दुपारी आरोग्य दान प्रार्थना, ख्रिश्त शरीर आराधना व प्रार्थना केली. या यात्रेसाठी सकाळपासूनच आदिवासींनी काकड्या, आळकुंड्या, टरबूज, चिंभोर्या आदी तसेच ग्रामीण भागात पिकणार्या भाज्या आणल्याने मुंबईकर ख्रिश्चन बांधवांनी ते घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सिल्व्हर फ्रान्सिस, पॉल फ्रान्सिस, अॅड. सनी डिमेलो, विल्सन पानपाटील, विक्टर मास्करेन्स, जेम्स जेकब, पेन्सर, नेल्सन फ्रांसिस, सुरेंद्र अंची, फ्रान्सिस जेनिफर, शाविओ फ्रान्सिस, जेनिफर फ्रान्सिस, संगीता भोईर, सिमरन फ्रान्सिस, देश विदेशातून असंख्य ख्रिश्चन बांधव-भगिनी उपस्थित होते.
