देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर ठाकरे सरकारने वटहुकूम का आणला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम केंद्र सरकार काढते, संसदेला तो अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान खूप तोकडं आहे. ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे. लाठीहल्ल्याचा आदेश सरकारने दिला नाही, असा दावा होत असेल तर याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले. माफी मागून सरकार मलमपट्टी करत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
ठाकरे सरकारच्या काळातील समितीने घोळ घातल्यानेच न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा आरोप फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केला होता. त्या समितीत अजित पवार व एकनाथ शिंदे हे तेव्हाचे मंत्रीदेखील होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शिंदे व पवार यांनी आपली जबाबदारी झटकली होती. संघनायक म्हणून उद्धव हेच या समितीच्या अपयशाला जबाबदार होते, असे या दोघांनी म्हटले होते.
यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “अजित पवार यांना मी समजूतदार समजत होतो. मी संघनायक होतो, त्यावेळी मी चुकत होतो तर अजित पवार हे विकेटकिपर काय करत होते? आता जालनामध्ये जी डोकी फोडलीत त्याचं श्रेय टीमवर्क म्हणून घ्यावं.” मी आधी गृहमंत्री यांचा राजीनामा मागत होतो. आता तर, एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
माफी मागणे ही मलमपट्टी राज्य सरकारने लाठीहल्ल्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, जनभावना विरोधात जात असल्याने ही माफी मागून मलमपट्टी करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. जालन्यातील घटनेबाबत सरकार माफी मागते, मग बारसू येथील लाठीचार्जबद्दल माफी का मागत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.