कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र रोहा यांची संयुक्त पाहणी
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यामध्ये रोवळा, वरळ व कुंभळे या भागात क्रॉप सॅप निरीक्षणामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. या किडीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शास्त्रज्ञांचे पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ जीवन आरेकर व तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी तालुक्यातील रोवळा, गणेशनगर, कुंभळे व पन्हेळी या गावांना भेट दिली. भात पिकाची पाहणी केली. रोवळा येथे मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते. या क्षेत्रावरती आलेल्या खोडकिडीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार परिसरात कामगंध सापळे लावून या अळीवर नियंत्रण मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. या भेटी दरम्यान आलेल्या पथकाने कीडग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. त्या नंतर कुंभळे येथे भात उत्पादक शेतकऱ्यांची सभा व शेती शाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमात जीवन आरेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खोडकिडा ही भात पिकातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. या किडीची अळी सुरवातीच्या काळात कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते परिणामी फुटवा सुटण्यास सुरवात होते व रोपाचा गाभा मरतो. यालाच कीडग्रस्त फुटवा असे म्हणतात. या रोपाचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात, असे सांगितले.
एकात्मिक पद्धतीने किडीचे नियंत्रण केल्यास किडीवर नियंत्रण करता येऊ शकते असे सांगीतल. नियंत्रण उपाय याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. या नंतर कृषी विभागाकडून गणेशनगर कुंभळे व पन्हेळी येथे घेण्यात येत असलेल्या भात व नागली शेतीशाळा वर्गास पथकाने भेट देऊन पाहणी केली. भात व नागली पिकाविषयी मार्गदशन केले या पाहणी दौरा कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र रोहा जीवन आरेकर,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे,आत्मा बीटीएम सचिन लोखंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.