अलिबागसह पोयनाड येथील तीन गुन्हयांची उकल
| अलिबाग | प्रतिनिधी |
ड्रीम इलेव्हनद्वारे पैसे कमविण्याच्या नादात कर्ज बाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग स्विकारला. मात्र रायगड पोलीसांच्या जाळ्यात अडकल्यावर त्याला कारागृहाची हवा खावी लागली. अलिबाग परिसरातील महिलांना टारगेट करीत त्यांच्या गळयातील दागीने लंपास करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
निखील पद्माकर म्हात्रे असे या चोरट्याचे नाव आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील तो रहिवासी आहे. त्याचे काही वर्षापूर्वी लग्न झाले. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गुण्यागोविंदाने संसाराचा गाडा चालत होता. मात्र त्याला ऑनलाईन ड्रीम इलेव्हन या खेळाची आवड होती. आपल्याकडील असलेल्या क्रेडीट कार्डचा वापर करून तो क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा चालवत होता. या खेळाच्या आहारी जाऊन तो लाखो रुपयांचा कर्जबाजारी झाला. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला. यातून मार्ग काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु त्याला काहीच मार्ग मिळाला नाही. अखेर त्याने चोरीचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला. अलिबाग परिसराची माहिती घेतली. त्यानंतर त्याने महिलांना टारगेट करीत सोनसाखळी चोरण्याचा निर्णय घेतला.
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील महिला 15 जूलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शेतामधूनचालत परहूरपाडा झारखंड असा डांबरी रस्त्याने प्रवास करीत होती. दुचाकीवर येऊन त्याने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरून नेली. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पेढांबे येथील महिला गावातून चालत जात असताना तिच्या गळ्यातील सोन्याचे गंथन व लहान मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. 2 ऑक्टोबर रोजी दुुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सहाणगोठी येथील पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागीने चोरून नेले. अलिबागमध्ये दोन व पोयनाडमध्ये एक असे तीन गुन्हे दाखल झाले होते.
या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, रुपेश निगडे, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल, पोलीस नाईक विशाल आवळे, पोलीस शिपाई अक्षय सावंत, स्वामी गावंड यांना चोरट्यांचा शोध सुरु केला. खबऱ्यांसह सायबरसेलच्या मदतीने माहिती घेण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये एक संशयीत व्यक्ती आढळून आला. त्याची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीसी दणका मिळाल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. पोयनाड, अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुम स्टाईलने सोन साखळी चोरल्याचे त्याने कबूल केले.
त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सदर आरोपीकडून 6 लाख20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.