। पुणे । प्रतिनिधी ।
शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही. कारण आता रेशनकार्ड छपाई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही.
रेशनकार्डला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात. तसंच, तुमच्याकडे असलेले रेशन कार्डही वॅलिड राहणार आहे. यासंदर्भात नागपूर जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी माहिती दिली.
ई -रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणार्यांना याची माहिती असणार आहे. या रेशनकार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई- रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण कसं होणार? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी पुरवठा अधिकारी पडोळे म्हणाले की, ई – रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणार्यांना याची माहिती असणार आहे.
दरम्यान, आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई- शिधापत्रिकाच मिळणार आहे. तसंच, ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे, त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे. सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत, त्याचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई-रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे, असंही पुरवठा अधिकारी पडोळे यांनी स्पष्ट केलं.