कपडे, भांडी, आकर्षक भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी
| रायगड | प्रतिनिधी |
खरेदी शिवाय दिवाळी सणाला उत्साह येत नाही. गरीब असो वा श्रीमंत दिवाळीत कपड्यांसह भांडी आणि अन्य भेट वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. भाऊबीजेच्या सणासाठी बाजारातील दुकाने चांगलीच ग्राहकांच्या गर्दीने बहरली आहेत. तरुणाईला नवनवीन आधुनिक फॅशनचे वेडं असल्याने ते हटके तयार कपड्याच्या शोधात जिल्ह्यातील विविध दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसते. दिवाळीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळीत कपडे खरेदीमध्ये महिला, लहान मुले व तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील सुमारे अडीज हजार कपड्यांची दुकाने आधुनिक कपड्यांनी सजलेली आहेत. बाजारात नवनवीन कपड्यांच्या डिझाईन्स सातत्याने येत असतात. दिवाळी निमित्त तयार कपड्यांचे विविध प्रकार पहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाची ड्रेस मटेरियल दुकानात उपलब्ध असल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी उसळलेली आहे. तरुणांमध्ये अनेक फॅशनचे कपडे बाजारात आल्याने खासकरून तरुणाईंची दुकानांमध्ये अधिक प्रमाणात गर्दी दिसत आहे. टी-शर्ट, शर्ट, ट्राऊझर, जीन्स दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी, तसेच भाऊबीज, धनत्रयोदशीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागत असल्याने हे कपडे खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारही उपलब्ध आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये या दिवाळी हंगामात तब्बल 30 कोटी रुपयांची उलाढाल या दुकानांमध्ये होत असते. स्थानिक दुकानदारांबरोबरच ब्रॅण्डेड कंपन्याच्या शोरूममध्येही चांगली वर्दळ दिसत आहे.
महिलांसाठी पर्वणीच दिवाळीची खरेदी म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे महिलांचा दुकानांमध्ये वावर वाढलेला आहे. साड्या, विविध प्रकारचे ड्रेस, सलवार सूट, अनारकली, गाऊन, कुर्ती, खासणांसाठी वापरले जाणारे कपडे याला महिलांची विशेष मागणी आहे. प्लाझो, स्कर्ट, फ्रॉक स्टाईल व जॅकेट स्टाईल कुर्ता यामध्येही महिलांसाठी आकर्षक प्रकार बाजारात आले आहेत. विविध भांडी, आकर्षक भेटवस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये महिलांची झुंबड उडाली आहे.