जैस्वाल, ॠतुराज, इशानची तडाखेबाज खेळी; मालिकेत 2-0 ने आघाडी, बिष्णोई-कृष्णाची भेदक गोलंदाजी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाने तिरुवनंतपुरम इथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना गुवाहाटी इथे 28 तारखेला होणार आहे. भारताने 235 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 191 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने केलेल्या पॉवरप्लेमधील तुफानी धुलाईनंतर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशानच्या शानदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची पिसे काढली. त्यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीने ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान दिले. यशस्वी जैस्वालने (53) अर्धशतक झळकावले. तर ईशान किशननेदेखील 52 धावंची खेळी केली. सूर्याने 10 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग आणि तिलक वर्मा नाबाद परतले. रिंकू सिंगने 9 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा 2 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू शॉर्ट, जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना झटपट गमावलं. पाठोपाठ स्टीव्हन स्मिथही तंबूत परतला. यानंतर मार्कस स्टॉइनस आणि टीम डेव्हिड यांनी 38 चेंडूत 81 धावांची शानदार भागीदारी रचली. रवी बिश्नोईने ही जोडी फोडली. डेव्हिडने 37 धावांची खेळी केली. थोड्या अंतरात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर मार्कस स्टॉइनस बाद झाला. त्याने 25 चेंडूत 45 धावांची खेळी केली. प्रसिध कृष्णाने शॉन अबॉटला त्रिफळाचीत केलं. यानंतर मॅथ्यू वेडचा 42 धावांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारतातर्फे प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन विकेट्स पटकावल्या. अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.







