। टोक्यो वृत्तसंस्था
जपानची राजधानी असलेल्या टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलनं देशासाठी पहिले रौप्य जिंकले. त्यानंतर अखेरच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरने सुवर्ण पदकासह भारताला स्पर्धेतील शेवटचे पदक मिळवून दिले. त्याच्या या पदकासह भारताने यंदाच्या स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह तब्बल 19 पदके जिंकत नवा इतिहास लिहिला आहे. यातील दोन सुवर्ण पदक ही बॅडमिंटनमधील आहेत. कृष्णासह प्रमोद भगतने गोल्डन कामगिरी नोंदवली होती. अवनी लेखारानं नेमबाजीतील भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. त्यानंतर पुरुष गटातील 50 मीटर पिस्टल प्रकारात मनिष नरवालने सुवर्णवेध साधला. भालाफेकमध्ये सुमित अंतिलने सुवर्णपदक मिळवले होते.
टोक्योतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह एकूण 19 पदकांची कमाई केलीये. 5 सुवर्ण पदकासह भारत गुणतालिकेत 24 व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिंकप्रमाणेच पॅरालिंपिकमध्ये चिनी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. चीनने 95 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य पदकासह एकूण 206 पदके जिंकली आहेत. त्यांच्यापाठोपाठ ग्रेट ब्रिटन 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 45 कांस्य पदकासह 124 पदक कमावली आहेत.
‘गोल्डन गर्ल’ला ध्वजवाहकाचा मान
टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखरा हिला मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कांस्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे.
पदकांचे शिलेदार :-
सुवर्णपदक विजेते – अवनी लेखारा (नेमबाजी), सुमीत अंतिल (भालाफेक), मनिष नरवाल (नेमबाजी), प्रमोद भगत (बॅडमिंटन), कृष्णा नागर (बॅडमिंटन)
रौप्यपदक विजेते– भाविना पटेल (टेबल टेनिस), निशाद कुमार (उंच उडी), योगेश काथुनिया (थाळी फेक), देवेंद्र झाझेरिया (भालाफेक) , मरिय्यपन थंगवलु (उंच उडी), प्रवीण कुमार (उंच उडी), सिंहराज अधाना (नेमबाजी), सुहास यथिराज (बॅडमिंटन)
कांस्यपदक विजेते– सुंदर सिंग गुर्जर (भालाफेक), सिंहराज अधाना (नेमबाजी), शरद कुमार (उंच उडी) , अवनी लेखारा (नेमबाज), हरविंदर सिंग (तिरंदाजी), मनोज सरकार (बॅडमिंटन)