निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मंत्री तटकरेंनी येणे टाळल्याची चर्चा
| पेण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत नव तेजस्विनी महोत्सव 2024 चे आयोजन (दि.22) ते 25 फेब्रुवारी दरम्यान पेण महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन मानापमानाचे नाट्य पहायला मिळाले. प्रारंभी उद्घाटक म्हणून मंत्री आदिती तटकरे व स्थानिक आ. रवीशेठ पाटील यांचे नाव होते. परंतु, मुख्य पत्रिकेतून आदिती तटकरेंचे नाव गहाळ झाल्याने त्यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणे टाळले, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. अखेर आ. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तेजस्विनी महोत्सवांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रायगड व ओम साई प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र अलिबाग यांच्यामार्फत महिला बचत गट वस्तूंचे तालुकास्तरीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन मानापमानाचे नाट्य पहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पहिल्यांदा तयार केली तेव्हा, उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांचे नाव टाकण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव अथवा चूक भुलीने अधिकारी वर्गाकडून अंतिम पत्रिकेमध्ये महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे नाव गहाळ झाले. त्यामुळे सर्व पेणमध्ये अशा चर्चांना रंग आला की, आदितीताईंचे पत्रिकेमध्ये नाव नसल्याने नव तेजस्विनी महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. या चर्चेमुळे ज्या महिलांनी या प्रदर्शन व विक्रीमध्ये सहभाग घेतला होता त्यांची पुरती तारांबळ उडाली. अनेक महिला बचत गटांकडून समाजमाध्यमांवर त्यांनी केलेल्या तयारी व सामानाचे फोटो शेअर करण्यात आले. त्यामुळे रात्रभर या कार्यक्रमाचीच चर्चा सुरू होती.
अखेर रात्री आठच्या सुमारास स्थानिक आमदार रविशेठ पाटील, कोकण आयकॉन तथ पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, समाजसेविका वासंती देव यांच्या हस्ते फीत कापून नव तेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना आ.पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कार्यक्रम राबविले आहेत.आज देशाला महिला सबलीकरणाची गरज आहे. या महोत्सवामध्ये सहभाग घेणाऱ्या महिला बचत गटाने मोठ्या प्रमाणात स्वत:ने तयार केलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्या विकत घेउन महिलांना सहकार्य करायचे आहे. तर यावेळी ॲड. मंगेश नेने यांनी सर्व महिला बचत गटांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वय अधिकारी माविम रायगड अशोक चव्हाण, व्यवस्थापक शमिम चौधरी, प्रमिला गावडे अध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेविका अश्विनी गाडगीळ, नगरसेविका प्रतिभा जाधव, दिपश्री पोटफोडे, वर्षा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेण तालुका क्षेत्रीय समन्वय किरण म्हात्रे यांनी मेहनत घेतली. त्यांना सर्व महिला बचत गटाने तेवढीच साथ दिली आहे.






