| जळगाव | वृत्तसंस्था |
ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जळगावात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खा. उन्मेष पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजपने तिकीट कापल्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळेच पाटील ठाकरेंच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. यावेळी त्यांच्यासोबत करण पवारही उपस्थित होते. ते जळगावात मविआचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरक्षित नसल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांनी केला आहे. मात्र, उन्मेष पाटलांबाबत उद्याच कळेल असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक पार पडली. जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उन्मेष पाटील यांनी चांगले काम केले आहे. अनेक वर्ष ते भाजपाचे काम करत आहेत, अनेक चळवळींशी ते जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिमा चांगली आहे, असे असताना देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. उन्मेष पाटील यांच्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील त्यांचे शेकडो सहकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.