चहामुळे वाचले 48 वऱ्हाड्यांचे प्राण
। बुलढाणा । वृत्तसंस्था ।
बुलढाणा जिल्ह्यात एका खाजगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे 48 प्रवासी चहा घेण्यासाठी उतरल्याने थोडक्यात बचावले आहेत. मात्र, यात बसचे आणि प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर येथून लग्न आटोपून वऱ्हाड मंडळी खाजगी बसने बुलढाणा येथे येत होते. या बसमधून 48 जण प्रवास करत होते. पहाटे मेहकर फाट्यावर खासगी बस चहापाणी करण्यासाठी थांबली होती. यावेळी काही मंडळी चहा घेण्यासाठी उतरले तर, काही जण गाढ झोपेत होते. त्याचवेळी बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच बसमधले सर्व प्रवासी जागे होऊन पटापट खाली उतरले. क्षणार्धात बसने पेट घेतला. काही वेळातच बस जळून खाक झाली.
सुदैवाने सर्व प्रवासी थोडक्यात वाचले. कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, प्रवाशांचे सामान, मौल्यवान वस्तू, दागिने जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, ‘शॉर्ट सर्किट’मुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी हजर झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, भररस्त्यात बसला आग लागल्याने झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली.







