कृषी विभागाचा पुढाकार
। रायगड । प्रतिनिधी ।
कोकणात परसबागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोजच्या जेवणासाठी आवश्यक भाजीपाला अनेकजण घराच्या बाजूलाच असलेल्या परसबागेत लावतात. अगदी कडीपत्त्यापासून नारळाच्या झाडापर्यंत परसबागेत लागवड केली जाते. परसबागेतील या लागवडीला आता कृषी विभागाकडूनही प्रोत्साहन मिळत आहे. दुर्गम भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने यंदाच्या खरीप हंगामाकरिता बियाणांच्या 24 हजार पाकिटांचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले शिवाय परसबागेत भाजीपाला लागवडीचे प्रात्यक्षिके दाखवून त्यांना योजनेत सामावून घेण्यात येत आहे.
विशेषतः कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या कर्जत, खालापूर, पेण या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये पौष्टिक आहार पुरविण्यासाठी घराभोवती असलेल्या परसबागेत आता भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी टोमॅटोच्या पुसा, रुबी वाणाची निवड करण्यात आली आहे, तर भेंडीच्या अर्का, अनामिका, मिरचीचे ज्वाला वाण, चवळीचे पार्वती वाणाचे 25 ग्रॅम वजनाचे पाकिट निवड झालेल्या शेतकर्यांना देण्यात आले आहे. कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदेकडून शेगवा लागवडीची योजना तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. शेगवा लागवड योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता परसबाग योजनेतून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न आहे.
आदिवासी कुटुंबांच्या घराभोवती असलेल्या परसरबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची लागवड केल्यास आदिवासींना सकस आहार मिळू शकतो. त्यामुळे या भाजीपाला व फळांची लागवड करण्यासाठी आदिवासींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत होती. आदिवासींच्या आहारात जीवनसत्त्व व इतर आवश्यक पोषक द्रव्ये समाविष्ट करण्याच्या उद्देशाने ही पौष्टिक आहार योजना सरकारने अमलात आणली आहे. मात्र, तिची व्यापकता वाढवण्यात आलेली नव्हती.
परसबागेतील भाजीपाला लागवडीने सकस आहार घरच्या घरी पिकवता येते. कोकणात ही पद्धत फार पूर्वीपासून आहे, परंतु काही तालुक्यांमध्ये ती विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी टोमॅटो, भेंडी, मिरची, चवळीच्या 25 ग्रॅम बियाण्यांचे पाकिटे देण्यात येत आहेत, अशी 24 हजार पाकिटांचे संच वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
सतीष बोराडे,
प्रकल्प संचालक,
आत्मा.







