राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारने सोमवारी (दि. 30) देशी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. देशी गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी यासंदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. अशातच आता महाराष्ट्र सरकारनेही देशी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केलं आहे.
राज्य सरकारने काढलेल्या आदेशात गायीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य उपचारात गायीचे योगदान अमूल्य मानले जाते. गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सेंद्रिय शेतीमध्येही गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे. तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून, धार्मिक विधींमध्ये तिची पूजा केली जाते. गोमूत्र आणि शेण पवित्र मानले जाते. तसेच ते विविध धार्मिक समारंभात वापरले जाते. गायीचे दूध केवळ शारीरिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. भारतात गायीचा नेहमीच आदर केला जातो. वैदिक काळापासून आजपर्यंत गायीकडे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून पाहिले जाते. गायीमध्ये देवी-देवता वास करतात, असे मानले जाते. म्हणून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.