। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात सोमवारी (दि. 21) मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. तर, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणरा दर्शन शशिधर हेगडे (21) हा सोमवारी (दि. 21) रात्री उशिरा आपल्या दुचाकीने खाद्यपदार्थ आणण्यासाठी निघाला होता. दरम्यान दीड वाजताच्या सुमारास तो नितीन कंपनी जंक्शन परिसरात आला असता, एका भरधाव मर्सिडीज गाडीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत दर्शन गंभीर जखमी झाला. मात्र त्याची मदत न करता कारचालक तेथून पसार झाला. त्यानंतर दर्शनला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू आहे.







