वृद्धाश्रमात विविध साहित्याचे वाटप
। खांब | वार्ताहर ।
रोहा-अष्टमी नगरपालिका हद्दीतील अष्टमी येथील रहिवासी डॉ.असिफ कासकर यांनी वृद्धाश्रमातील वृध्दांना विविध प्रकारचे साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
डॉ.असिफ कासकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक व शैक्षणिक श्रेत्रात कार्यरत राहून नेहमीच गरजूंना मदतीचा हात पुढे करत आहेत. तर रोहे तालुक्यातील विविध माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या या सामाजिक कार्याला अनुसरून त्यांनी आपला दि. 19 ऑक्टोबरचा वाढदिवस रायगड जिल्ह्यातील माणगाव निजामपूर येथील माऊली वृद्धाश्रम बोरवाडी येथे जाऊन तेथील वृद्धांसमवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी कासकर परिवार यांच्याकडून तेथील वृद्धांना शाल, गाऊन, टी शर्ट आदी कपडे व फळे, सुकामेवा तसेच केकचे वाटप केले.
या कार्यक्रम प्रसंगी अशराफुनिसा कासकर, डॉ. असिफ कासकर, अरिफा कासकर, संदेश गमरे आदी कासकर परिवारातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान डॉ.असिफ कासकर यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.