वाढत्या महागाईने आर्थिक गणित बिघडले
| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला असला तरी अजूनही अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. मात्र, योजना जाहीर झाल्यापासून महागाईमध्ये झालेल्या वाढीमुळे लाडक्या बहिणींचे आर्थिक गणित बिघडले असून, घर चालवायचे कसे, या चिंतेने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात आहेत.
मुख्यमंत्री महोदय सांगत आहेत की, एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. हे जरी खरं असले तरी, महाराष्ट्रात महागाईचा भडका उडाला आहे. ही योजना जाहीर होण्याआधी संसारोपयोगी वस्तू अगदी आवाक्यात होत्या. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आल्यापासून महागाईने लाडक्या बहिणीच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. प्रत्येक घरात घरखर्च चालवणारी ही महिलाच असते. आपल्या कुटुंबातील दैनंदिन संसारोपयोगी घरखर्चाकडे सर्वात जास्त महिलाच लक्ष देत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी संसारोपयोगी वस्तूंचे भाव भडकले आहेत. यात खोबरे 140 रुपये प्रति किलो होते. आज रोजी 260 रुपये प्रतिकिलो आहे. गोडेतेल 105 रुपये प्रतिलीटर होते. आज रोजी 145 रुपये प्रतिलीटर आहे. लसूण 100 रुपये प्रतिकिलो होता. आज रोजी 400 चा आकडा पार केला आहे. मुद्रांक (स्टॅम्प पेपर) 100 रुपये होता. आता 500 रुपयांचा मुद्रांक पेपर केल्याने सर्वसामान्य जनतेची शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर होणारी शासकीय कामे आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरने करावी लागत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व गोष्टींवर महागाई वाढली असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
एकीकडे दान केल्याचे काम करीत असल्याचे जनतेला भासवायचे, आणि दुसरीकडे जनतेकडून चक्रवाढ व्याजाने पैसे उकळण्याचा डाव सरकारचा आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. मुलींना मोफत शिक्षण ही फक्त घोषणाबाजी आहे. कोणत्या मुलींना मोफत शिक्षण देत आहात. ते सांगा? अगदी प्राथमिक शाळेपासून ते माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींनासुद्धा मोफत शिक्षण मिळत नाही. फक्त निवडणुका जवळ येऊ लागल्या की विविध योजनांचे लाभ दिले जातात. परंतु, त्याच्या दुप्पट महागाईच्या मार्गाने जनतेकडून वसुली केली जाते. या सर्व गोष्टीचा सामना घर चालविणार्या महिलेला करावा लागतो. ही तारेवरची कसरत करताना अक्षरशः महिलांच्या डोळ्यात अश्रू येताना पाहायला मिळत आहेत.