1200 रुपये किलो दराने विक्री
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूडच्या समुद्रात सध्या टायनी, चैती जातीची कोलंबी मच्छिमारांना मिळू लागली असून, कोळी महिला कोलंबीचे सोलून सोडे करण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. एकदरा गाव, मुरूड, राजपुरी गाव येथील अस्सल ताजे कोलंबी सोडे प्रसिद्ध असून, पुणे, मुंबईत पर्यटक घेऊन जात असतात.
कोलंबी नसल्याने 15 ते 20 दिवसांपूर्वी सोडे किलोचा भाव 1600/- पर्यंत गेला होता. मात्र, कोलंबी उपलब्ध झाल्याने सध्या उत्तम प्रतीच्या सोड्यांचा किलोचा भाव 1200/- ते 1300/- दिसून येत आहे. मुरूड शहरातील मुख्य मार्केटमध्ये सकाळ-संध्याकाळ असे सोडे कोळी महिला भगिनी विक्रीस आणत आहेत. कोलंबीचे ताजे सोडे रुचकर, स्वादिष्ट असल्याने पर्यटकांना खूप आवडत असल्याने खरेदीसाठी विशेष करून सायंकाळी येताना दिसून येतात. कोलंबीप्रमाणेच पापलेट, हलवा, पाला, छोट्या सुरमई, मांदेली काही प्रमाणात बोंबीलदेखील येत असून, चिकन, मटण खाऊन कंटाळलेल्या खवय्ये मंडळींचे पाय मासळी मार्केटकडे वळत आहेत.
उत्तम प्रतीचे सोडे कोणते?
सरळ, लांब आणि काहीसा हिरवट रंग असणारे कोलंबी सोडे उत्तम प्रतीचे असतात, अशी माहिती मुरूड सागरकन्या मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन मनोहर बैले आणि संचालक रोहिदास मकू यांनी दिली.