कोट्यवधी रुपये खर्च; घनकचरा व्यवस्थापनाचे तिनतेरा
। नेरळ । वार्ताहर ।
कायम चर्चेत असणारी कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत पुन्हा एकदा नव्या वादाने चर्चेत आली आहे. कचरा डेपोतील कचरा जाळण्यात येत असल्याने त्यातून निघणार्या धुरामुळे सध्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरू लागले आहे. मात्र कचर्याच्या ढिगार्यातून निघणार्या या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना रोजच सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दरम्यान, कचर्याची विल्हेवाट न लावता घनकचरा कचरा डेपोमध्येच जाळण्यात येत असल्याने घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामपंचायतसाठी उभारलेल्या प्रकल्पाचे नेमके काय झाले, असा प्रश्न यामुळे समोर आला.
कोल्हारे-तळवडे रस्त्यावर कोल्हारे ग्रामपंचायतीचा माध्यमातून कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. बारमाही वाहणार्या उल्हास नदीच्या किनार्यावर हा डेपो असल्याने नदीचे अस्तित्व देखील धोक्यात आल्याने येथील कचरा डेपो बंद व्हावा, म्हणून नदी बचाव समितीकडून मागणी झाली होती. मात्र आता चक्क येथील कचरा डेपोवरील कचर्याला आग लावून तो नष्ट करण्याचे काम होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत माध्यमातून ही आग लावली जाते की, अन्य कशामुळे आग लागली जाते हा संशोधनाचा विषय आहे. मात्र कचरा जाळण्यात आल्यावर त्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेर धूर निघत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे. कचर्याच्या या धुरामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. सकाळी नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर पडतात. मात्र कुजलेल्या घाणीच्या उग्रवास आणि कचरा डेपोवरील धुरामुळे त्यांचा श्वास कोंडला जातो. अगदी घरादारापर्यंत धुराचा हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
कचर्याला लागलेल्या आगीतून निर्माण होणार्या या धुराचा वासही सहन होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शिवाय अनेक जणांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो.कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासनाचा येथे हलगर्जीपणा दिसून येत आहे.
प्रदूषणात वाढ
कचरा डेपोतून निघणार्या या धुराचा केवळ परिसरातील नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो असे नाही. तर हा धूर हवेत सर्वदूर पसरतो. त्यामुळे प्रदूषणातही वाढ होते. याचा फटका इतर नागरिकांनाही बसतो. इतकेच नाही तर अनेकदा डेपोवर मेलेली जनावरेही टाकली जातात. त्यामुळे धुरासह दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कचरा व्यवस्थापनाची बोंब
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक कोटीहून अधिक रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. या ठिकाणी नेरळ, ममदापूर, कोल्हारे ग्रामपंचायतीचा कचरा जमा करण्याचे सांगण्यात आले. परंतू कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. शहरातून दररोज हजारो टन कचरा संकलित होतो. मात्र तो कचरा ग्रामपंचायत प्रशासन इथे तिथे टाकताना दिसत आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कचर्यावर प्रक्रिया सुरू असून यातून खत निर्मिती केली जाते. मात्र रोज निघणारा कचरा, कचर्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट लागत नसल्याने कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत कचर्याचे डोंगर उभे राहत आहे.
कचरा डेपोतील कचरा जळण्यात येत असल्याचे समजले आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून कचरा जाळण्यात येत नाही. कचरा नेमका कोण जाळतो, याचा आम्ही शोध घेत आहोत.
-संजय राठोड
ग्रामसेवक, कोल्हार