| उरण | वार्ताहर |
दिघोडे बसस्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मुलांनी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि. 29) घडली आहे. या मुलांच्या पोटात दुखायला लागले व उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही विषबाधा शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्याने झाल्याचे रुग्णालयातील डॉ. प्रकाश मेहता यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावांतील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करत आहेत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत. त्यातच शनिवारी (दि.29) दिघोडे बसस्थानकाजवळील रस्त्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील, शुभम ठाकूर, निशांत भगत, रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले, तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉ. प्रकाश मेहता यांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आहेत. तरी, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या उघड्यावरील विक्री करणार्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
बाधित मुलांनी उघड्यावरील शोरमा हा अन्न पदार्थ खाल्ल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. तरी नागरिकांनी विशेष करून लहान मुलांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
– डॉ. प्रकाश मेहता





