| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या दोन जणांचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेले दोन जण पुण्याजवळील काळभोर येथील रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी 100मीटर दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्यांचे इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी (दि.13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अक्षय काळभोर (26), सौरभ काळभोर (26) ही अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, (24) बजरंग काळभोर (35), सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर गुरूवारी पाच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते. दरम्यान, वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दरीत कोसळली.