| चिरनेर | प्रतिनिधी |
निसर्गाशी नाते सांगणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगलेच रंग दाखविल्याने शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने या गंभीर समस्यकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यंदा पावसाला मे महिन्यातच सुरुवात झाल्याने पेरणी वाया जाण्याच्या भीतने शेतकऱ्यांनी सुरुवातीला भात पेरणी केली नाही. त्यानंतर पाऊस सारखाच कोसळत राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जूनच्या पाच-सहा तारखेपासून पेरणीला सुरुवात केली. मात्र, पावसाचा वेग वाढतच राहिला. त्यामुळे भातरोपे तयार न होताच भात कुजून गेले. महागडी बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केली होती. ही बियाणे शेतकऱ्यांनी भातरोपे तयार करण्यासाठी वापरली. मात्र, बियाण्याचे भातच शेतात कुजून गेल्याने, निसर्गाशी नाते सांगणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. असे असून देखील शेतकऱ्यांनी पुन्हा एक वार दुबार भात पेरणी केली. मात्र, पाऊस थांबण्याचे नाव न घेत असल्यामुळे तेही भात बियाणे शेतातल्या शेतात कुजून गेले आहे. आता भात बियाणे केंद्रावर सुद्धा मिळत नसल्यामुळे तसेच घरातील उरल्या सुरल्या भात बियाण्यांचा देखील शेतकऱ्यांनी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्याच्या भाताची पंचायत झाली आहे. विशेषता: धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने या भात बियाणाला उगविण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे तालुक्याबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे.







