| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी व ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यामुळे ते भारतीय संघाच्या एक दिवशीय संघाचे सदस्य आहेत. ही दोघं ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता होती. पण, आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा प्रभावीपणे रद्द झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात नियोजित असलेल्या मालिकेची तयारी थांबवली आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले राजनैतिक संबंध याचा परिणाम असल्याचे समजते. हा दौरा रद्द होण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पण, भारताविरुद्धची ही मालिका पुढे होईल, अशी आशा आहे. आम्ही तोडगा काढण्याचा विचार करत आहोत. घाई करण्यात काही अर्थ नाही. आम्ही वेगवेगळे करार देऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने ढाका येथून क्रिकबझला सांगितले.
या मालिकेबद्दल कोणतीही निश्चित भूमिका घेतली नाही, परंतु एका अधिकाऱ्याने सांगितले की एका आठवड्याच्या आत निर्णय अपेक्षित आहे. भारताला 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान तीन वन डे आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत क्रिकेटचे संबंध तोडण्यात यावे, अशी मागणी आहे. कोणत्याही बाजूने अधिकृत माहिती आली नसली तरी, राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा दौरा पुढे न नेण्याचा सल्ला दिला असल्याचे मानले जाते.







