| रोहा | प्रतिनिधी |
बीईसी केमिकल्समध्ये घडलेल्या गॅस गळतीच्या घटनेने रोह्यातील औद्योगिक सुरक्षेचा फुगा फुटल्याचे चित्र आहे. एकीकडे कंपनी कागदोपत्री सुरक्षा मानके दाखवत राहते, तर दुसरीकडे रात्री ड्युटी करत असलेल्या कामगाराला गॅस गळतीमुळे आयसीयुत जावे लागते, ही दुर्दैवाची आणि संतापजनक बाब आहे.
पंकेश रामचंद्र पाटील (35), रा. न्हावे, रोहा हे 1 ऑगस्ट रोजी नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना गॅस गळतीमुळे त्रासाला बळी पडले. मळमळ, दम लागणे, खोकला सुरू झाल्यानंतरही त्यांनी ड्युटी पूर्ण केली. परंतु, नंतर त्यांची प्रकृती अधिकच बिकट होत गेली. सुरुवातीला त्यांना रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. त्यावेळी पंकेश पाटील यांनी सांगितले की, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावडरची बॅच घेऊन ट्रॅक्टरजवळ टाकण्यासाठी जात होतो. त्यावेळी प्लांटमधून येणारा वायू नाका-तोंडात गेला. त्यानंतर खूप त्रास व्हायला लागला. त्यावेळी रमन बलकवडे आणि महेंद्र कदम यांनी माझी विचारपूस केली. मी तशाच अवस्थेत ड्युटी पूर्ण केली आणि घरी गेलो, असे सांगितले.
दरम्यान, ही घटना एखाद्या मशीनच्या चुकीमुळे घडलेली नाही. तर, सतत दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा परिणाम आहे. गॅस गळती ही अपघाती नाही, ती व्यवस्थेतील दुर्लक्षाची सजीव साक्ष आहे, असा आरोप बीईसी केमिकल्समधील कामगार करत आहेत. तसेच, ड्युटीवर असताना त्रास सुरू झाला तरी, कंपनीने वेळेत दखल घेतली नाही. एचआर आले, ते पण फक्त दाखवण्यासाठी. त्यामुळे आमचं आयुष्य ‘कॉस्ट कटिंग’ मध्ये मोजलं जातंय का? प्रशासन झोपेचं सोंग घेणार का? की मोठी दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार? अशी घटना घडूनही औद्योगिक सुरक्षा निरीक्षक, कामगार कल्याण अधिकारी, प्रशासन कोठे आहेत? की साारख्या मोठ्या नावांसमोर कारवाई थांबते? अशे संतप्त प्रश्न कामकार विचारत आहेत.
कंपनीमध्ये अशी घटना घडली आहे. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी संबंधित कामगाराने कंपनीला माहिती दिली नाही. तातडीने आम्हाला माहिती दिली असती तर लगेच उपचार सुरू करता आले असते. कंपनी जखमी कामगाराच्या पाठीशी आहे. क्रिटिकेअर रुग्णालयात चांगले उपचार मिळावेत हा हेतू आहे.
गजानन बामणे,
वरिष्ठ व्यवस्थापक, एच.आर., बीईसी केमिकल्स







