| मुरुड | प्रतिनिधी |
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात बोंबील येत असल्याने बुधवार, शुक्रवार व रविवार या दिवशी मुरुडच्या मासळी बाजारात खवय्यांची प्रचंड गर्दी होत असते. यावेळी संपूर्ण मासळी बाजार रस्त्यावर सुरू असतो, त्यामुळे हा मुख्य रस्ता असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने या मासळी विक्रेत्यांना मासळी बाजाराच्या इमारतीत बसण्यासाठी सांगावे. त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनसामान्यांतून जोर धरत आहे.
मुरुड नगरपरिषदेने मासळी विक्रेत्यांसाठी भव्यदिव्य अशी इमारत उभारली आहे. या ठिकाणी विक्रेत्यांसाठी सुंदर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. बाजाराच्या आवारात पार्किंग व्यवस्था केली आहे. परंतु, मासळी विक्रेते या इमारतीचा वापर करत नाहीत. ते वाहन पार्किंगच्या ठिकाणी व रस्त्यावर सर्रास मासळीचा बाजार थाटून बसत आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक व पर्यटकांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने लक्ष पुरवून लवकरात लवकर रस्त्यावरील मासळी बाजार इमारतीत भरवावे, न ऐकणाऱ्या मासळी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनमानसातुन जोर धरत आहे.







