मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
| खोपोली | प्रतिनिधी |
प्रत्येक महिला सदृढ असेल तरचं कुटुंब व गाव सदृढ बनेल. तरच ग्रामपंचायत सक्षमपणे काम करेल. त्यामुळे या अभियानात सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे मत कोकण भवनचे अप्पर आयुक्त माणिक दिवे यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुशासन आणत कार्यक्षमता वाढविणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत गावोगावात विकासाची गंगा पोहोचवणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे या उद्देशाने राज्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा खालापूर तालुक्यातील शुभारंभ बुधवारी (दि.17) शिरवली ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गट विकास अधिकारी संदीप कराड, यशदा पुणेचे प्रशांत मूने, कृषी विस्तार अधिकारी अभिजीत खैरे, सहाय्यक गट विकास अधिकारी रोहन तावरे, रोशन कदम, माजी उपसभापती एच.आर.पाटील, सरपंच महेश पाटील, उपसरपंच गीता बांदल, ग्रामपंचायत अधिकारी अंकुश पाटील, सदस्य संदीप मोरे, विजय ढेबे, रामदास जाधव, करुणा जाधव, दीपाली जाधव, तलाठी प्रियंका वागे आदी प्रमुखांसह शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला, ग्रामस्थ व तरुणाई उपस्थितीत होती.
कार्यक्रमादरम्यान बोलताना दिवे म्हणाले की, प्रत्येक महिला सदृढ असेल तरचं कुटुंब व गाव सदृढ बनेल. तरच ग्रामपंचायत सक्षमपणे काम करेल. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थाचे बळकटीकरण व विकास योजनांची आखणी करण्यासाठी उपस्थितांच्या सूचना विचाराधीन घेण्यात येणार असून लोकाभिमुख प्रशासन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छता, सौरऊर्जा वापर, मनरेगा योजनेचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग अशा महत्त्वाच्या क्षेत्रांवर ग्रामपंचायतींची कसोटी पाहिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक गाव समृद्ध झाले तर, राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत राबविले जाणार आहे. या अभियानात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत.
संदीप कराड,
गटविकास अधिकारी,
खालापूर पंचायत समिती







