| सुतारवाडी | प्रतिनिधी |
एप्रिल महिन्यापासून कोलाड ते विले या 18 किमी अंतरावर पडलेले लहान-मोठे जीवघेणे खड्डे आता उग्ररूप धारण करून हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. वाळजवाडी येथील नागमोडी वळणांवर साईड पट्टी अत्यंत दुरवस्थेत आहे. या लहान मोठ्या खड्ड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची मेहनत न घेता खडी टाकण्यात आली आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे ही खडी आता वर येऊ लागली आहे. या खडीमुळे दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. या वाहनांना येथून जाणे अवघड झालेले असून, रात्रीच्या वेळी दूरचाकी घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने परतीचा प्रवास घेतला तरी प्रशासनाला जाग येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया प्रवासी वर्गातून उमटत आहेत.







