आवास मतदार संघातील कार्यकर्त्यांना विश्वास
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मारामारी, भ्रष्टाचार, पाण्याचा सौदा करुन धनदांडग्यांसोबत हित जोपासणाऱ्या दिलीप भोईरांना जागा दाखविण्याचा विडा जनतेनंच उचलला असल्याचं चित्र सध्या आवास मतदारसंघात दिसून येत आहे. आवास मतदारसंघात जनतेने आता निर्णय घेतला आहे. धूळ, तहान आणि अंधार देणारा कारभार आता पुरे झाला. दयनीय रस्ते, नळ कोरडे आणि महिलांना रात्री पाण्यासाठी भटकावं लागत असताना फार्महाऊस, रिसॉर्टला 24 तास मुबलक पाणी पुरवठा होत आहे. हा विकास नाही, हा जनतेचा अपमान आहे. जनतेच्या पाण्यावर सौदे करणारे, विकासाच्या नावाखाली धूळफेक करणारे, गुंडगिरी, मारहाण करुन आवाज दाबणारे आम्हाला आता नको, अशी प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडणूकीत पैसा, दबाव आणि दिखावा बाजूला सारून जनता आपला आवाज निवडणार आहे. म्हणूनच आवासमध्ये परिवर्तन नक्की होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. परिणामी, भोईरांच्या कारभाराला कंटाळून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे राजाभाऊंना पाठिंबा दर्शविला आहे.
आवास मतदारसंघातील रस्ते अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून धुळीच्या लोटात जनता गुदमरते आहे. पर्यटनाचा गाजावाजा करणारे सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र रस्ते, पाणी, वीज या मूलभूत प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप राजाभाऊ ठाकूर यांनी केला. पर्यटनासाठी फोटोसेशन, पण गावकऱ्यांसाठी विकास शून्य, असा बोचरा टोला त्यांनी लगावला.
स्थानिकांना डावलून बाहेरच्या ठेकेदारांना कामे दिली जात असून टक्केवारीचा काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हा विकास नाही, हा लुटीचा धंदा आहे. स्थानिकांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,फफ असा थेट इशारा त्यांनी दिला. पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी सत्ताधाऱ्यांची निर्घृणता उघडी पाडली. बोडणीपासून अनेक गावांतील महिलांना आजही रात्री जागून पाणी भरावे लागते, ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.
वर्षानुवर्षे सत्तेत असताना पाण्याचा प्रश्न सुटला नाही; पण धनदांडग्यांच्या फार्महाऊसला, रिसॉर्टला मात्र पाणी मुबलक आहे, असा आरोपही त्यांनी केला. धनदांडग्यांना पाणी पाजणारे लोकप्रतिनिधी आता घरी बसले पाहिजेत, असा थेट राजकीय निकाल देत राजाभाऊ ठाकूर यांनी आवास मतदारसंघात परिवर्तनाचे रणशिंग फुंकले आहे.
माजी आ. स्व. मधुकर ठाकूर यांच्याकडून राजकारणासह समाजकारणाचे बाळकडू घेतले आहे. त्यांनी दिलेला वारसा आजही जपण्याचे काम केले जात आहे. या मतदार संघात समाजसेवेच्या नावाखाली लुट केली जात आहे. समाजसेवा कशी अशी असावी, याचे भान राहिले नाही. सध्या जे राजकारण चालू आहे, ते सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे आहे. ज्यांना जनतेने निवडून दिले. त्यांनाच सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. सात फेब्रुवारीला मतदान आहे, आणि नऊ फेब्रुवारील मतमोजणी आहे. येणारी नऊ तारीख आपलीच आहे, अंतरामध्ये येऊन ही निवडणूक लढविली जाईल, असा विश्वास राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केला.
शिव्या देणारा दळवींच्या दारात - महेंद्र घरत
राजा भाऊ ठाकूर हे कार्यकर्त्यांच्या पसंतीचे उमेदवार आहेत. चोंढी ही ऐतिहासिक भूमी आहे. या भुमीत अनेक लढे झाले आहेत. शेकापचे नेते स्व. नारायण नागू पाटील यांनी तालुक्यात खोती विरोधात लढा दिला. आवास जिल्हा परिषद मतदार संघात राजा भाऊ ठाकूर यांच्या विरोधात उभा असलेला उमेदवार आता शिंदे गटात गेला आहे. विधानसभा निवडणूकीत दळवींविरोधात शिव्या देत हेोते. आता त्यांच्या दारात गेले आहेत. राजकारण विचित्र आहे. महेंद्र दळवींचे सर्व पक्ष झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या मक्तेदारी विरोधात लढण्यासाठी शेकाप, काँग्रेससह विविध पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले आहेत. आघाडी अबाधित राहिली पाहिजे. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला. रस्ते, पाणी, बेरोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजे. त्या पध्दतीने आपण काम करीत आहोत. रस्ते, पाणी हे गरजेचं साधन आहे. खेळाची मैदाने अबाधित राखणे आवश्यक आहे. हक्कासाठी लढलो नाही, तर मुस्कटदाबी होईल. गावांची निर्णायक ताकद राहणार नाही, असे काँग्रेसचे नेते महेंद्र घरत यांनी सांगितले.
पावलात नाही तर अंतरात येणार….
बैलगाडीप्रेमींकडून राजाभाऊंना आश्वासन
आवास मतदारसंघात राजाभाऊंना मिळणारा जनसमर्थनाचा लोंढा अधिक मजबूत होत असून बैलगाडीप्रेमींनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. आवास मतदारसंघात राजाभाऊंच्या बाजूने वातावरण तापत असून बैलगाडीप्रेमींनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. पावलात नाही तर अंतरात येणार, असा इशारा देत राजाभाऊंसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. ग्रामीण संस्कृती, शेतकरी परंपरा आणि स्थानिकांच्या हक्कांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राजाभाऊ सातत्याने आवाज उठवत असल्यानेच हा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. पैशाच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला कंटाळलेली जनता आता बदलासाठी सज्ज झाली आहे. या लढ्यात राजाभाऊ एकटे नसून बैलगाडीप्रेमी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.







