। पनवेल । प्रतिनिधी ।
लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभाग नोंदवणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. हीच जाणीव कृतीतून दाखवत पळस्पे गावातील विराज राजेंद्र माटे या नवरदेवाने आपल्या लग्नाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
लग्नसोहळ्याच्या घाईत न अडकता, आज सकाळी पारंपरिक वेशभूषेत विराज माटे यांनी प्रथम मतदान केंद्र गाठले. हातावर शाईचा ठसा उमटवत त्यांनी आपले मतदान केले आणि त्यानंतर लग्नमंडपाकडे प्रस्थान केले. नवरदेवाचा हा क्षण पाहण्यासाठी मतदान केंद्रावर नागरिकांची उत्सुकता वाढली होती.
‘लग्न आयुष्यात एकदाच येते, पण लोकशाही टिकवण्यासाठी मतदान हे तितकेच महत्त्वाचे आहे,’ अशी भावना विराज माटे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीचे उपस्थित नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मनापासून कौतुक केले. नवरदेवाच्या या निर्णयामुळे परिसरात सकारात्मक संदेश गेला असून, विशेषतः तरुणांनी मतदानाबाबत अधिक जागरूक राहावे, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.






