आयसीसीसमोर तीन मागण्या; 15 फेब्रुवारीला होणार सामना
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर अजूनही अनिश्चितेची छाया कायम आहे. या स्पर्धेत भारताविरुद्ध सामना खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकरिता कोणतीही अधिकृत लेखी माहिती दिलेली नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारी रोजी बहुप्रतीक्षित भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता अद्याप जिवंत आहे.
टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठा सामना घडवून आणण्यासाठी आयसीसीकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रविवारी, 8 फेब्रुवारी रोजी आयसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानने भारताविरुद्धचा बॉयकॉट मागे घेण्यासाठी आयसीसीसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत. मात्र, यापैकी एक अट भारत कधीही मान्य करणार नाही, असे स्पष्ट चित्र आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसीसमोर पुढील तीन मागण्या मांडल्या आहेत.
पाकिस्तानची दुसरी मागणी म्हणजेच भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याची भारतासाठी पूर्णपणे अमान्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 साली खेळली गेली होती. गेल्या 16 वर्षांपासून राजकीय तणावामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येत आहेत. मागील वर्षी भारतात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधातील भारताची भूमिका अधिकच कठोर झाली आहे. या घटनेनंतर आशिया कप 2025 पासून भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणेही बंद केले आहे. पाकिस्तानच्या उर्वरित दोन मागण्या कदाचित चर्चेच्या पातळीवर मान्य झाल्या, तरी द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पाकिस्तानच्या अटी
आयसीसीकडून पाकिस्तानला अधिक महसूल वाटा द्यावा.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करावी.
टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे.
दुसरी मागणी भारताला मान्य नाही.







