आंबा मोहोर करपण्यास सुरूवात
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्यामुळे बागायतदार चिंतेत सापडले आहेत. थंडी पूर्णपणे कमी झाली असून दिवसा उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा बागांमध्ये मोहर करपण्यास सुरुवात झाली असून कणी ते वाटाणा आकारातील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडू लागली आहेत.
डिसेंबर महिन्यात योग्य प्रमाणात थंडी पडल्याने आंबा झाडांना चांगला मोहर आला होता. त्यामुळे बागायतदारांना समाधानकारक उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र जानेवारी अखेरपासून हवामानातील बदलामुळे परागीकरणावर परिणाम झाला असून त्यातच काही भागात पुनर्मोहर दिसून आला आहे. याआधी आलेली फळधारणा देखील कमी झाली आहे. सध्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे झाडांवरील शिल्लक मोहर काळवंडत असून लहान फळे पिवळी पडून गळत आहेत. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, थ्रीप्स व तुडतुडा यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. मात्र, त्यावर पूर्ण नियंत्रण मिळत नसल्याचे बागायतदार सांगत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ 1,910 हेक्टर इतके आहे. त्यामध्ये 90 टक्के हापूस तर त्या खालोखाल पायरी व केसर आंब्याची लागवड बागायतदारांनी केली आहे. डोंगरउताराच्या तसेच वरकस जमीन आंबा पिकासाठी योग्य आहेत. पोषक हवामान व झाडांची निगा यावर मोहोर अवलंबून असतो या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने बागांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे.







