पुनर्वसु फाऊंडेशन, वन्यवाणी ग्रुपचा उपक्रम
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सी.बी.डी. बेलापूर परिसरातील बिबट्याबाबतचे गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी पुनर्वसु फाऊंडेशन आणि वन्यवाणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक विशेष प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आला. ॲग्रो गार्डनच्या जुई यांच्या पुढाकाराने आयोजित वसंतउत्सव कार्यक्रमात ‘भारूड-ए-बिबट’ या विषयावर प्रभावी कलाविष्कार सादर करून नागरिकांना मानव-वन्यजीव सहजीवनाचा संदेश देण्यात आला.
मकरंद भास्कर सावंत यांचे लेखन व दिग्दर्शन आणि कुणिका बनसोडे सावंत यांची निर्मिती असलेल्या या भारुडाचे सादरीकरण महेश कापरेकर आणि सागर चव्हाण यांच्या टीमने केले. या उपक्रमात पुनर्वसु फाऊंडेशनतर्फे प्रितम दिलीप भुसाणे, उत्कर्षा चव्हाण, उमेश अवधूता, अष्टविनायक मोरे, सृष्टी सोनवणे, शुभम दळवी आणि स्मिता दळवी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
बिबट्या हा सजीव साखळीचा अविभाज्य भाग असल्याने बिबट्याला मानवाचा शत्रू मानणे चुकीचे आहे. बिबट्या किंवा अन्य प्राण्यांच्या अधिवासावर विकासाच्या नावावर अतिक्रमण केले जात असल्याने ते मानवी वस्तीकडे वळत आहेत. खरे तर आपण त्यांच्या घरावर अतिक्रमण केले आहे. बिबट्या हा नेहमी आपल्या नजरेच्या उंचीपेक्षा कमी उंची असणाऱ्या भक्ष्यावर हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या समोर दिसल्यास माणसाने ताठ उभे रहावे किंवा उंच भागावर जावे, शक्यतो वनपरिसरात फिरताना, किंवा शेतात काम करताना मोबाईलवर गाणे वाजवावेत, ग्रुपने ट्रेकिंग जावे, अशी बहुमूल्य माहिती यातून देण्यात आली.
पाणी साठ्यांचे पुनर्जीवन करण्याची मागणी
मानवाने नैसर्गिक पाणी साठे नष्ट केल्यामुळे उन्हाळ्यात वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत पुनर्वसु फाऊंडेशनच्या उत्कर्षा चव्हाण आणि प्रीतम भुसाणे यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. यामध्ये सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे वनविभागाने सेक्टर 8 बेलापूर टेकडीच्या पायथ्याला असलेल्या जुन्या तलावाचे तात्काळ पुनर्जीवन करावे. तसेच, सेक्टर 9 परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी पावसाळ्यात वाहणारे पाणी अडवण्याची व्यवस्था करून वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाने तात्काळ या मागण्यांची दखल घेऊन बेलापूर हिलचे नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांचे रक्षण करावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.







