पाणी योजनांचे 13 कोटींचे वीज बिल थकीत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात आलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे तब्बल 13 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनांशी संबंधित सुमारे 1 हजार 75 ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी न भरल्याने त्यांचे वीज कनेक्शन खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कनेक्शनवरच अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने वीजपुरवठा बंद झाल्यास जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागात महावितर विस्तृत जाळे उभे करण्यात आले आहे. लाखो ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम महावितरण कंपनीमार्फत करण्यात येत आहे. घरगुती, व्यापारी तसेच औद्योगिक ग्राहकांबरोबरच विविध सार्वजनिक योजनांसाठीही वीजपुरवठा महावितरणकडूनच केला जातो. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांद्वारे विहिरी, धरणे किंवा जलसाठ्यांमधून मोटारींच्या साहाय्याने पाणी उचलून गावांपर्यंत पोहोचविले जाते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी वीजपुरवठा अत्यावश्यक असतो. मात्र, अनेक योजनांच्या वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 75 ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही. या ग्राहकांकडे एकूण 13 कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास संबंधित कनेक्शन खंडित करण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, अशी कारवाई झाल्यास अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठाही हळूहळू कमी होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, धरणांमध्ये केवळ सुमारे 50 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे काही भागात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, गावागावात पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. याच काळात जिल्ह्यात विविध धार्मिक उत्सव, पालख्या तसेच विवाह समारंभांची लगबग सुरू असते. अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्याशी संबंधित वीज कनेक्शन खंडित झाल्यास या कार्यक्रमांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर थकीत वीज बिल तातडीने भरून पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. अन्यथा येत्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






