| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या कृत्यांमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा मलिन झाली असून, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी तृप्ती देसाई यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. अंधभक्तांमुळे अशोक खरातसारख्या विकृत भोंदूंचे फसवणुकीचे रॅकेट सुरू राहते, असा आरोप करत मंदिर वगळता त्याच्या सर्व मालमत्तेवर सरकारने बुलडोझर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात राजकीय व प्रशासकीय स्तरावरून दडपशाही करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, अशा व्यक्तींवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशोक खरात प्रकरणात तब्बल नऊ मंत्र्यांची नावे समोर येत असल्याचे धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केली जात आहे. खोटे नाग, बनावट रत्न, परदेशी मध असल्याचे भासवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी समाजाने जागरूक होणे गरजेचे आहे. खरातने शिर्डीसह विविध ठिकाणी अनेक जमिनी बळकावल्याचा आरोप करत, विरोध करणाऱ्यांच्या मृत्यूबाबतही संशय व्यक्त करण्यात आला. तसेच मागील वर्षी हे प्रकरण समोर येत असताना पोलिसांवर दबाव आणून ते दाबण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
रूपाली चाकणकर यांचा उल्लेख करत देसाई म्हणाल्या की, त्यांच्या कार्यकाळातील काही बाबींची चौकशी होणारच असून, संबंधित पुरावे एसआयटीकडे सादर करण्यात आले आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा दिला ही उशिराने का होईना योग्य बाब असल्याचेही त्यांनी म्हटले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीका करत, त्या या प्रकरणात पूर्णपणे गायब असल्याचा आरोप देसाई यांनी केला. त्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा त्यांना “वॉन्टेड” म्हणून जाहीर करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत, असे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर भाष्य करत, भूमाता ब्रिगेड मार्फत गावोगावी जाऊन जनजागृती केली जात असून, बलात्कारमुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.







