विजय तोडणकर थेट सरपंचपदी विजयी
| बोर्लीपंचतन | मकरंद जाधव |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीच्या दि.28 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून दिवेआगर विकास आघाडीचे विजय सुदाम तोडणकर यांनी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने यापूर्वी थेट सरपंच म्हणून निवडून आलेले सिद्धेश कोसबे आणि इतर आठ सदस्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दि.9 ऑक्टोबर 2025 रोजी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत थेट सरपंचपदासह एकूण 9 जागांसाठी मतदान झाले. या प्रतिष्ठेच्या लढतीत विजय तोडणकर यांनी सिद्धी सिध्देश कोसबे व स्वाभिमानी संघटनेच्या सुरज सुरेश राणे या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत थेट सरपंचपदी विजय मिळवला. त्याचबरोबर दिवेआगर विकास आघाडीच्या माध्यमातून तीन सदस्यही निवडून आले. या विजयाने त्यांनी स्थानिक राजकारणात आपले अस्तित्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. श्रीवर्धन नगरपंचायत निवडणुकीतील थेट नगराध्यक्षपदाचा पराभव, पंचायत समितीच्या बोर्ली पंचतन गणातील अपयश आणि आता दिवेआगर ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीतील थेट सरपंचपदाच्या निवडणूकीत मोठ्या फरकाने झालेला पराभव यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे राहिले आहे. खासदार सुनील तटकरे व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे.
उमेदवार निवडीबाबत पक्षाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचना व विनंत्याकडे दुर्लक्ष केल्यास अशाच पराभवाचा सामना यापुढेही पक्षाला करावा लागू शकतो, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. विजयानंतर विजय तोडणकर यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी मतदारांचे आभार मानत, दिवेआगरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले. या निकालामुळे दिवेआगर ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरण बदलले असून आगामी काळात विकासकामांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







