| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी मे महिन्यात पर्यटकांची मांदियाळी असते. या पर्यटकांना पाणी मुबलक मिळावे, यासाठी माथेरान नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून याबाबत सहकार्य मिळत नसून, त्यांच्याकडून पाण्याची कटोती करण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांनी माथेरान येथील जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन पर्यटन हंगाम सुकर जाण्यासाठी पाण्याच वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.
माथेरान येथे पर्यटन हंगाम सुरू असतानाही माथेरानकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी मे महिन्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. परंतु, याच हंगामात पाण्याचा तुटवडा होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये जीवन प्राधिकरण विरुद्ध संतापाची भावना पसरली आहे. नेरळ जवळील कुंभे येथून उल्हास नदीतून माथेरानसाठी पाणी उचलून जुम्मापट्टीमार्गे माथेरान येथे आणले जाते. हा मार्ग घाट मार्ग असल्याने या मार्गावर तीन ठिकाणी पंपगृह उभारण्यात आले आहेत. कुंभे ते जुम्मापट्टी या पहिल्या टप्प्यात 16 तास पंपिंग होत असते. तर, पुढे वॉटर पाईप ते दस्तुरी आणि दस्तुरी ते जलशुद्धीकरण केंद्र असे पाण्याचे पंपिंग केवळ 10 तास होत आहे. मागील काही दिवसांपासून माथेरानमध्ये अवघे 8 तास पंपिंग झाल्याचे समोर आले आहे. त्यात शारलोट लेकवरील पंपिंग बंद असून तलावात 32 फूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तलावाची स्वच्छता न झाल्याने सुमारे 15 फूट गाळ साचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, फिल्टर हाऊसमधील सफेद रेती संपल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होत असून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. नेरळहून येणाऱ्या जलवाहिनीवर अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्या करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. एकीकडे शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल केली जात असताना दुसरीकडे पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, पालिकेतील विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर धडक देत परिस्थितीची पाहणी केली. तेथील जीवन प्राधिकरणाचे अभियंते उपस्थित नसल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी वॉटर पाईप येथील पंप हाउस येथील आणखी एक पंप बसविण्याची मागणी केली. पाण्यावर आपले पर्यटन अवलंबून असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केले. त्याचवेळी माथेरानसाठी नेरळ येथून सरासरी 15 तास पंपिंग होत होते, मात्र आता ते आठ ते दहा तासांवर का आले, याची चौकशी करण्याची मागणी केली.







