रस्त्यावर सर्वत्र मोठ-मोठे खड्डे; वाहन चालकांना करावी लागते कसरत
| वावोशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वावोशी गाव ते वावोशी फाटा हा सुमारे 3.780 किमी अंतराचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत 1 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आला. तब्बल 178.40 लक्ष रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम आज रस्ता बनवण्याचा अंतिम कालावधी संपून गेला असून, आज देखील तो रस्ता पूर्ण झालेला नाही. आज पावसाळा तोंडावर आलेला असताना या रस्त्याच्या कामाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असताना रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खडी व वाळू बाहेर आली असून, रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वारांना वाहने चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत असून, अनेकदा वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. तसेच रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक नागरिक, दुकानदार, विद्यार्थी व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे परिसरात प्रदूषणाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पावसाळ्यात नागरिकांनी खड्डेमय रस्त्याचा मोठा त्रास सहन केला होता. मात्र, यावर्षीही या परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या रस्त्यावर पाण्याच्या निचऱ्याचे कोणतेही योग्य तांत्रिक नियोजन करण्यात आलेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे उखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वावोशी गावातील हनुमान मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामातही गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. पुलाला दोन्ही बाजूंनी पूर्ण रेलिंग बसविण्यात आलेले नसल्यामुळे वाहन थेट नाल्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा रस्ता गोरठण बुद्रुक, वावोशी आणि होराळे या तीन ग्रामपंचायत हद्दीतून जातो. या मार्गावरून विद्यार्थी, महिला, शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक तसेच प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्ता अद्याप अपूर्ण का? काम पूर्ण होण्यापूर्वीच खड्डे कसे पडले? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मागील पावसाळा आम्ही या खड्डेमय रस्त्यातून काढला आहे. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला, पण रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
स्थानिक नागरिक,
वावोशी







