| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी परिसरात गोवंश कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेण्यात येत असलेल्या दोन गोवंशांची आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका करत संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
अखिल आर्यंवत संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा संघटन मंत्री राजन टेकडीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन अडवले.
या कारवाईत गोसेवक गुरुनाथ बांगर, गणेश ढोणे, हेमंत भगत, रुपेश गायकर, भूषण धुमाळ, मच्छिंद्र मगर आणि तेजस गायकर यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी वाहन ताब्यात घेत दोन्ही गोवंशांची सुटका केली आणि तात्काळ पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत गुन्हा नोंदवला. सुटका करण्यात आलेले गोवंश जवळील मान्यताप्राप्त गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले आहेत.






