दरडी, भूस्खलनामुळे प्रवास धोक्यात; कायमस्वरूपी वैज्ञानिक नियोजनाची मागणी
| राजापूर | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा शॉर्टकट म्हणून ओळखला जाणारा अणुस्कूरा घाटमार्ग गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरडी कोसळणे, माती घसरणे आणि दगड रस्त्यावर येणे अशा घटनांमुळे धोकादायक बनत चालला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या पुढील पावसाळ्यात निष्प्रभ ठरत असल्याने घाटरस्त्यासाठी कायमस्वरूपी मास्टर प्लॅनची मागणी जोर धरू लागली आहे. सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा अणुस्कूरा घाटमार्ग घाटमाथा आणि कोकण यांदरम्यान कमी वेळेत प्रवासासाठी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यामुळे या मार्गावर वर्षभर वाहतुकीची वर्दळ असते. मात्र नागमोडी वळणे, उंच कडे, सैल दरडी आणि उभ्या दगडी कपारी यांमुळे हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांत अतिवृष्टीदरम्यान अनेकदा मोठ्या प्रमाणावर माती व दगड रस्त्यावर कोसळल्याने घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता.
विशेषतः घाटातील पिकनिक स्पॉट परिसर सातत्याने भूस्खलनाच्या घटनांमुळे धोक्याचा पट्टा बनला असून पावसाळ्यात येथे वाहतूक विस्कळीत होते.
स्थानिकांच्या मते, दरवर्षी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्त्यांऐव जी घाटरस्त्याचे सखोल सर्वेक्षण करून धोकादायक दरडी, अरुंद वळणे, संभाव्य भूस्खलन क्षेत्रे आणि आवश्यक संरक्षण कठडे यांचे वैज्ञानिक नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचे सांगितले आहे.
प्रवासाच्या दृष्टीने अणुस्कूरा घाट सुरक्षित राहावा यासाठी बांधकाम विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात घाटरस्त्यावर आपत्ती ओढवल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
स्वप्नील बावधनकर,
कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग







