| चणेरा | प्रतिनिधी |
रासायनिक खतांचा वापर कमी करून शाश्वत, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी केले. पंचायत समिती रोहा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात त्या बोलत होत्या.
जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्यांमध्ये रोहा तालुक्याचा मेळावा पहिल्या पाच उत्कृष्ट आयोजनांमध्ये असल्याचे सांगत त्यांनी कृषी विभागाच्या कार्याचे कौतुक केले. महिला शेतकऱ्यांसाठी महिला व बालविकास विभागामार्फत तीन टक्के निधी राखून ठेवण्यात आल्याचे सांगत रायगड जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनीही विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याचा उल्लेख करत आता रिठा सुपारी आणि वाल पिकालाही जीआय मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेसाठी लागणारी झाडे स्थानिक शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात यावीत, त्यात फळझाडांचाही समावेश असावा, असे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी नितीन पिंपळे, भिकू सुटे, रोशन कापसे, अदिती थिटे, संज्योत पडवळ, किरण बारटक्के, अमित गायकवाड, मेघेश भगत, दगडू बामुगडे, दिपाली जाधव, शिवाजी मुटके आणि तुकाराम भगत यांचा अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बिजामृत शेतकरी उत्पादन कंपनी, ग्रोवेल शेतकरी उत्पादक संस्था, विवेकानंद रिसर्च, युवा कृषी उद्योग, संथाय प्रकल्प आणि दीपक फाऊंडेशन यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी सभापती वैकुंठ पाटील, सभापती उर्वशी वाडकर, निधी जाधव, सुमित काते, विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलूस्कर, विनोद पाशिलकर, किसन मोरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी खरीप हंगाम, कृषी योजना आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी रणजीत लवटे यांनी केले. कृषी मेळाव्यास तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.







