जुई गावात जवानांसह वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान
| मुंबई | प्रतिनिधी |
“देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र बर्फात आणि ऊन्हा-तान्हात उभ्या राहणाऱ्या जवानांबद्दल केवळ आदर ठेवून चालणार नाही, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे प्रत्येक गावकऱ्याचे कर्तव्य आहे,“ असे प्रतिपादन जुई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश देवळे यांनी केले. जुई येथील नवतरुण मित्र मंडळ, श्री जन्नी देवी सेवा मंडळ, मुंबई आणि जुई ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमात भारतीय सैन्यात कार्यरत असणाऱ्या आणि सुट्टीवर आलेल्या गावातील तीन वीर जवानांचा, त्यांच्या त्यागी परिवारासह टाळ्यांच्या कडकडाटात आणि अत्यंत भावूक वातावरणात सन्मान करण्यात आला. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला!
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे देशाचे रक्षण करणाऱ्या तीन नायकांचा झालेला सत्कार. यामध्ये नायक रूपेश रामदास दवंडे, नामदेव दवंडे, प्रमोद पांडुरंग भावे या तीनही जवानांना आणि त्यांच्या सहपरिवाराला (माता, पिता आणि पत्नी) मंचावर बोलावून जेव्हा त्यांचा गौरव करण्यात आला, तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी उभे राहून जवानांना मानवंदना दिली. जवान सीमेवर असताना मागे घर सांभाळणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा हा सत्कार खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरला. याच सोहळ्यात ऑन ड्युटी असणारे लष्कराचे जवान राजेश शिंदे (तेलगें) यांची उपस्थिती तरुणांसाठी विशेष प्रेरणादायी ठरली. गावचे सरपंच समिर देवळे यांनी जवानांच्या कामगिरीचा गौरव केला. तर माजी पंचायत समिती सदस्या अश्विनी घरटकर आणि ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बेर्डे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी ह.भ.प. विठोबा तुकाराम देवळे, ऍड. राजेश देवळे, संदेश गोठल, गजानन दवणे, सूर्यकांत दवणे, अरविंद घरटकर, सुदाम वाडकर, लक्ष्मण तुपट, राम तुपट, संतोष तुपट, अस्लम काझी आणि इनायत करबेलकर आदी, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अरविंद घरटकर यांच्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने झाली. त्यांनी गावाचा लष्करी वारसा आणि मंडळांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर आपल्या बहारदार आणि राष्ट्रभक्तीपर शेरोशायरीने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण करण्याचे काम सूत्रसंचालक मिलिंद चिविलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी सूर्यकांत दवंडे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ, मुंबईहून आलेले चाकरमानी आणि मुख्यत्वे जवानांच्या कुटुंबियांचे आभार मानले.
मुंबईतील जन्नी देवी सेवा मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि गावातील नवतरुणांनी मिळून केलेलं हे नियोजन जुई गावाच्या एकतेचे आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरले आहे. या सोहळ्याची चर्चा आता संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे.






