| उरण | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात गौरव केला जात असताना, उरणमध्ये मात्र भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावालाच विरोध केल्याने संतापाची लाट उसळली आहे. उरण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या नामकरण ठरावांना भाजपच्या सर्व 12 नगरसेवकांनी विरोध दर्शवल्याने शहरात भाजपच्या भूमिकेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोमवार, दि. 18 मे रोजी नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पालवी हॉस्पिटल समोरील चौकाला “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक” तसेच एन.आय. हायस्कूल समोरील चौकाला “जागतिक कीर्तीचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणाऱ्या भाजप नगरसेवकांनीच या ठरावांना विरोध करून स्वतःच्याच विचारसरणीचा विरोधाभास उघड केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानले जातात. संसदेत, विधानसभेत आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्या भाजपने उरणमध्ये मात्र त्यांच्या नावालाच विरोध केल्याने “दिल्लीत एक आणि गल्लीत एक” अशी जोरदार टीका नागरिकांतून केली जात आहे.
विशेष म्हणजे, उरण नगरपरिषदेत अनेक वर्षे भाजपची सत्ता असतानाही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. “स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान” परिसर कचऱ्याने भरलेला होता. मात्र, सत्ता बदलल्यानंतर नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांसह प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छता मोहीम राबवली आणि अनेक वर्षांची घाण हटवली. भाजपला वर्षानुवर्षे जे जमले नाही, ते काही महिन्यांत करून दाखवल्याची चर्चा आता नागरिकांतून होत आहे. याशिवाय शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ असणे, महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, तुंबलेली गटारे, नादुरुस्त रस्ते आणि गंजलेले इलेक्ट्रिक पोल यांसारख्या मूलभूत समस्यांवर भाजप नगरसेवकांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोपही केला जात आहे. या सर्व प्रकारामुळे उरणमध्ये भाजपविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, “शिवराय आणि सावरकर यांच्या नावाने मतं मागायची आणि प्रत्यक्षात त्यांच्या नावालाच विरोध करायचा,” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.







