दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा गावाजवळ पोलीस चौकीसमोर शनिवारी (दि.30) मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य किशोर बल्लाल आणि यश मुकेश बल्लाल (मूळ रहिवासी पाचांबे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी; सध्या वास्तव्य विक्रोळी, मुंबई) हे दोघे युवक दुचाकीवरून कोकणातून मुंबईकडे जात होते. शनिवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास खारपाडा येथे पोहोचल्यावर डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच दादरसागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार ब्राह्मणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली.
प्राथमिक तपासात डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहने, डंपर आणि ओव्हरलोड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, मद्यधुंद व बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि अवजड वाहनांच्या तपासणीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.







