| तळा | प्रतिनिधी |
तळा शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक मोदी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
मोदी तलावाच्या सुशोभीकरणासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रेलिंगची उभारणी, पायऱ्यांवर ग्रॅनाईट बसविणे तसेच तलावालगत असलेल्या गाळ्यांवर पत्रे बसविणे अशी विविध कामे प्रस्तावित आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमीपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या हस्ते 5 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. मात्र, भूमीपूजनाला तब्बल पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही काम पूर्णत्वास पोहोचलेले नाही. विशेष म्हणजे, तलावातील गाळ काढण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर तलावातील गाळ बाहेर काढणे कठीण होणार आहे. त्यामुळे सुशोभिकरणाच्या मूळ उद्देशालाच बाधा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठा निधी खर्च करूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत. तलावाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, कामाच्या संथ गतीमुळे हा प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ पूर्णपणे काढून उर्वरित सुशोभिकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी तळावासियांकडून करण्यात येत आहे.







