| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मान्सूनचे आगमन जवळ आले असले, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आणि इतर पूर्वमशागतीची कामे उरकली आहेत. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. जून महिना सुरू होताच शेतकऱ्यांमध्ये शेतीकामांची लगबग वाढते. बियाणे, खते आणि औषधांची खरेदी करून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून लवकरच दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. शेती हा पावसावर अवलंबून असलेला प्रमुख व्यवसाय असल्याने वेळेवर आणि पुरेसा पाऊस पडणे अत्यंत आवश्यक आहे. पाऊस लांबल्यास पेरणीत विलंब होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग सध्या चिंताग्रस्त आहे. त्यामुळे “कधी बरसणार मेघराजा?“ हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.







