| उरण | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या प्रस्तावित तिसरी मुंबई ( न्यू टाऊन) प्रकल्पाविरोधात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. “तिसरी मुंबई नकोच, आमच्या जमिनी देणार नाही, शेतकरी एकता जिंदाबाद!” अशा घोषणांनी सरकारला इशारा देत बुधवार दि.1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोकण आयुक्तालयावर भव्य जाहीर निदर्शने करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
एमएमआरडीए तिसरी मुंबई विरोधी 124 गाव शेतकरी संघर्ष समिती, 88 गाव एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समिती (पेण) आणि एमएमआरडीए केएससी नवनगर (तिसरी मुंबई) विरोधी समिती रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात राज्य सरकारच्या जमीन संपादन धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, घरे आणि गावांवर बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन दिली जाणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील शेकडो गावे प्रस्तावित तिसऱ्या मुंबईच्या कक्षेत येत असून, हजारो शेतकरी, भूमीपुत्र आणि ग्रामस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्यांच्या मातीतून उखडून टाकण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका संघर्ष समितीने स्पष्ट केली आहे.







