। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर मधील भारती विद्यापीठ मागील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या 17 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
खारघर डोंगर परिसर निसर्गरम्य वातावरण, धबधबे, तलाव आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी पाऊस सुरु होताच मुंबईसह नवी मुंबई परिसरातील मोठ्या संख्येने पर्यटक खारघर मध्ये भेट देतात. मात्र, अनेक पर्यटक सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन तलावातील खोल पाण्यात उतरतात. त्यामुळे दरवर्षी अपघाताच्या घटना घडत असतात. मुंबई शहरातील धारावी येथील काही तरुण खारघर मध्ये फिरण्यासाठी आले होते. भारती विद्यापीठ मागील डोंगराच्या पायथ्याशी असलेला तलाव सध्या मुसळधार पावसामुळे पूर्ण भरुन वाहत आहे. या तलावात काही तरुण पोहण्यासाठी उतरले. परंतु, तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने आश्रफ शेख (17) तलावातील पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







