| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, तर काही नद्या धोक्याच्या पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी डेपोमध्ये प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने बसस्थानकात नेहमीची गर्दी दिसत नाही. अनेक प्रवाशांनी आपले प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सतत वाढणारा पावसाचा जोर, पूरस्थितीची शक्यता आणि महामार्गावरील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. हवामानातील बदल लक्षात घेता पुढील काही तास नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







