उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता; नुकसानाचे पंचनामा करून भरपाईची मागणी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
मागील आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे याचाच फटका परखंदे येथील शेतकरी वर्गाना बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ व माती साचली असून अनेक ठिकाणी जमीन व खडकाळ बनली आहे. त्यामुळे यंदाच्या भात लागवडीवर मोठे संकट ओढवले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले. झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते आहे.
भात लागवडीसाठी शेतात टाकण्यात आलेले राब पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीखाली पूर्णपणे गाडले गेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेली पूर्वतयारी वाया गेली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचे काम ठप्प झाले आहे. पाऊस थांबल्यानंतरही शेत पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने उत्पादनक्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अतिरिक्त खर्च करून पुन्हा लागवडीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाकडून योग्य आर्थिक नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी परखंदे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत मदत मिळाल्यास पुढील शेतीची कामे सुरू ठेवणे शक्य होईल, अन्यथा यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परखंडे गावामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची सदर तक्रार आमच्याकडे आले असून, त्या अनुषंगाने आम्ही सोमवारी जाऊन पाहणी करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या झालेले शेतीचे नुकसान संदर्भात नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जाईल.
मुकेश शेट्टे
कृषी सहाय्यक, खोपोली
आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसाने अक्षरशा: शेतकऱ्यांची दाणादाण उडून दिली आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती दगड हे मोठ्या प्रमाणात आल्यामुळे भात लागवडसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतात तयार होत असलेले राबावर सुद्धा याचा परिणाम झाला आहे.
हेमंत पाटील
शेतकरी परखंदे







